शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

नवी पहाट

 

नवी पहाट

सरली ती रात्र काळोखी
उजाडली नवी सोनेरी पहाट
चकाकणाऱ्या दवबिंदूचा
तृण पातीवर निराळा थाट

किलबिलाती झेप घेती
अवकाशात ते खुळे पक्षी
प्रभाकराच्या तांबूस वर्तुळावर
भासे जणू कोरलीच नक्षी

उंच उडी घेती कड्यावरूनी
दुधाळ,शुभ्र ते झरे पांढरे
मध्येच शांत मध्येच उसळती
नादात बागडती सागराची लेकरे

वृक्ष वल्ली सवंगडी सूरांचे
सळसळती कोकीळ गण्यावरती
वाऱ्याच्या त्या तालावरी
चहू दिशेकडे लयात डोलती

गीत नवे मुखी पाखरांच्या
ऐकूनी या वेड्या मनास भावे
सौंदर्य उषेचे जणू चित्र रेखाटलेले
जागवी आशा ,नयनी स्वप्न नवे

*सचिन विश्राम कांबळे*



गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

छोटी परी

 

इटूकले पिटूकले हात परीचे
चिमुकले चिमुकले कान
भिरभिरते नजर चहूकडे
घारे डोळे किती दिसे छान

रुपेरी पाळणा परी तुझा
मधोमध फिरतो खेळणा
पाहून हसते गोड परी माझी
गदागदा हले तो पाळणा

दिसे कधी ना रडताना तू
हसवी तू कशी साऱ्यांना
रूप तुझे दिसे जणू गौरीचे
टाकले मागे साऱ्या परीना

तूच आधार बापा जीवनाचा
तूच जगणं आम्हा शिकवशी
लक्ष्मीचे पाऊल तुझे म्हणती
मग का तू कुणा वाटे नकोशी

**सचिन विश्राम कांबळे**


मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

बाबा गातो अंगाई

नीज नीज माझ्या बाळा
बाबा गाती तुला रे अंगाई 2
कुठे आज गेली नीज तुझी
बाबा झोपवी तुज बनूनी आई

सुमसान झाल्या वाटा
शांत झाले पक्षी प्राणी
पुन्हा आज जाग्या झाल्या
आईच्या तुझ्या आठवणी

रोज पाळण्यात झुलवूनी
झोपवी तुला तुझी आई
नीज तुजला नाही येता
गात होती रे ती अंगाई

नाही सखा ना कोणी सोबती
तूच सखा तूच सर्व काही
करीतो विनवणी बाबा तुझा
तरी तू बाबाचे ऐकत नाही

किती करू अजून रे धडपड
माया ती शेवटी आधुरी राही
तुझ्या पुढे हरलो मी आता
सांग कसा बनू मी तुझी आई

**सचिन विश्राम कांबळे**

कोण पंख तुझे झाले

 

पाह पंख कोण तुझे झाले
त्यात बळ कोणी रे भरले
दिले तुज सारे आपले बळ
ना पाहिले स्वतःकडे काय उरले

फड फड पंखांची तुझ्या
ना पहावली कधी त्यांस
घ्यावी उंच भरारी पिल्लाने
हीच नित्य मनी धरली आस

घेतली उंच झेप तू जेव्हा
पाणावले आनंदाने ते डोळे
शिकविले तुज अवरोध भेदण्या
सोडविण्या संकटाचे जाळे

माणूसच ते या आशेत जगले
वृद्धवयात काठी बनून देशी आधार
फेडशी पांग कधी तरी याचे
तूझेवरच त्यांच्या जगण्याची मदार

**सचिन विश्राम कांबळे**


सोमवार, १७ जानेवारी, २०२२

मुके

 


तहान अन् पोटा भुकेसाठी
वण वण बिचारे ते फिरती
तळपणाऱ्या सूर्याच्या उष्णतेने
लाहीलाही जीवांना त्या होती

ना इशारा,ना खाणा खुणा
मुके बिचारे ते काय बोलती
ना बोलके भाव,ना असे शब्द..
नजरेने कसे कुणा खुणवती

एक वाटी पाणी, पसाभर दाणे
पुरेसे होईल वाटेच्या वाटसरुना
मिळे पुण्यांचा तो वाटा घेण्याची संधी
मुक्या जीवांचे जीव वाचवताना

एक एक थेंब थेंब ते पाण्याचे
वाचवी एक एक जीव बहु मोलाचे
पाण्याचे ते मोल साऱ्यांनी जाणून
करावी सुरुवात कुणा नव जीवन देण्याचे

**सचिन विश्राम कांबळे**


सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

मम्मी पप्पा तुमचं प्रेम हवं

तुमच्या असण्या नसण्याच्या
मम्मीपप्पा किती ओ नोंदी ठेवू
तुमच्या शिवाय एकटाच आहे मी
बोचतो हा एकांत कसा मी राहू

का असं दूर केलतं मला तुम्ही
दिली मनावर न भरणारी चिरका
तुम्ही असूनही मम्मी..पप्पा
का असा झालो आहे मी पोरका

नको मला श्रीमंती नको तो पैसा
का करता भविष्याची माझ्या चिंता
हवंय तुमचं फक्त प्रेम मला
कसा सोडवू प्रेमाचा तुमच्या हा गुंता

द्या थोडा वेळ मला खेळा माझ्याशी खेळ
प्रेमाने हाक मारून मायेनं गोंजारावं
डोळ्यातले अश्रू माझ्या पुसून
लाडाने कधीतरी जवळ मला घ्यावं

कळेल का मन माझं कधी तुम्हाला
कळेल का तुम्हाला माझी दशा
तुम्ही माझ्यापासून दूर ना व्हावे
हीच जीवनातली सगळ्यात मोठी आशा

***सचिन विश्राम कांबळे***



बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

पक्षी बनून पहावं

पक्षी बनून वाटे उडावे
घ्यावी उंच उंच भरारी
गरगर भ्रमण करीत जावे
निळ्या निळ्या अंबरी

खेळावे बागडावे तिथे
झुळझुळ वाहे पाणी जिथे

सागरावरून उडावं
वेलींबरोबर डोलावं
उंच उंच झाडच्या फांदीवर
सहज जाऊन बसावं

वाऱ्याच्या झोतात वाहून
मन करेल तिथं विसावं
पंखांचा पिसारा फुलवून
फुलांना आपल्या कुशीत घ्यावं

हवं ते करावं इकडून तिकडे
जीवन स्वच्छंदी जगावं
सुंदर दिसणाऱ्या निसर्गाला या
पक्षी बणून अगदी जवळून पाहावं

**सचिन विश्राम कांबळे**



मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

प्रेम करून पाहावे

 प्रेम म्हणजे काय? प्रेम काय असते

जेव्हा कळते तेव्हा मात्र 

हातातून वेळ निघून गेलेली असते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते


एकमेकांच्या चुका काढण्यात

वेळ वाया घालवलेला असतो

त्यावर एकमेकांना समजण्याचा

प्रयत्न देखील केलेला नसतो

एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात

प्रेमाचं अस्तित्व कमी झालेले असते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते


अजूनही वाटलं वेळ गेलेली नाही

जरूर प्रयत्न करून पहावे

झालेल्या चुका, गैरसमज

प्रेमानेच बदलून घ्यावे

कमी झालेले प्रेम हे

थोड्याशा तडजोडीने पुन्हा मनात वसते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते


एकच लक्षात असावे

सरलेली वेळ परत येत नाही

भूकाळात परत जाऊन

वावरता येत नाही

कोण चुकीचं,कोण बरोबर

कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ

वादात या आयुष्य आपले

गुरफडून गेलेले असते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक काहीच नसते......


समंजसपणा, विचाराची कुवत

यानेच प्रेम टिकत असते

एकमेकांच्या नजरेने पाहत खोलवर

परणामी तुमचेच चित्र दिसते

प्रेमानं विश्व जिंकावं

ही भावना जेव्हा मनात रुजते

आयुष्याची बेरीज वजाबाकी करत

हातात शेवटी शिल्लक गुणाकार रुपी बरेच काही असते.


***सचिन विश्राम कांबळे***

नवी पहाट

  नवी पहाट सरली ती रात्र काळोखी उजाडली नवी सोनेरी पहाट चकाकणाऱ्या दवबिंदूचा तृण पातीवर निराळा थाट किलबिलाती झेप घेती अवकाशात ते खुळे पक...